राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त, संविधानीक संस्था असून राज्यकारभाराच्या तिसऱ्या स्तराच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, ज्यामध्ये पंचायत राज संस्था व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश होतो, निवडणूका घेण्याची संविधानिक जबाबदारी आयोगावर आहे.
सन १९९२ पुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या संबधित राज्य शासनाकडून घेण्यात येत असत. सन १९९२ मध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांना कायदेशिर दर्जा देण्यासाठी, तसेच देशाच्या जडणघडणीत त्यांना योग्य ते स्थान देण्यासाठी भारतीय संविधानात 73 व 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली.
अनुच्छेद 243 ट (243 K) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) चा समावेश करुन प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोग या संविधानीक संस्थेची स्थापना करण्यात आली व आयोगावर, निवडणुकांसाठी आवश्यक मतदार याद्या तयार करण्याचे तसेच निवडणुकांचे 'अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण' करण्याची संविधानीक जबाबदारी सोपविण्यात आली. 73 व 74 वी घटना दुरुस्तीस अनुसरून, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगामध्ये राज्य निवडणूक आयुक्तांचा समावेश असून त्यांची नियुक्ती मा. राज्यपालांकडून पाच वर्षांच्या कालावधी साठी केली जाते आणि तत्पुर्वी उच्च न्यायालयालयाच्या न्यायाधीशांना पदच्चुत करण्यासाठी जी कार्यपद्धती वापरली जाते ती अवलंबिल्याशिवाय आयुक्तांना पदच्चुत करता येत नाही.
संविधानातील तरतुदीनुसार नागरी तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे 'अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण' करण्याची संविधानीक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे.
राज्याच्या विवीध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यातील तरतुदीनूसार राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करत नाही तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनूसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या संबधित मतदार संघाच्या मतदार याद्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागानुसार विभाजीत करून वापरण्यात येतात.
सन २०१५ पासून, सर्व निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्याचे विभाजन सॉफ्टवेअरद्वारे केले जाते व त्यासाठी, भारत निवडणुक आयोगाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचेकडून सॉफ्ट डाटा पुरविला जातो.
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच दर ५ वर्षांनी, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे क्षेत्र प्रभागात विभाजीत / प्रभांगाचे परिसीमन करण्याची जबाबदारी देखील राज्य निवडणूक आयोगावर आहे.
राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे तसेच नोंदणी रद्द करण्याचे अधिकार देखील आहेत. सन २००५ पासून, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, स्वत:चे उमेदवार उभे करु इच्छित असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना (भारत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असणाऱ्या पक्षांसह) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्राकडे नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने विकसित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर कटाक्षाने भर देवुन राज्य निवडणूक आयोग, निवडणुक लढविणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या रिंगणात समान संधी उपलब्ध करून देते.
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.